पुणे – मुख्यालयात न राहणाऱ्या डॉक्‍टर्सवर कारवाईची मात्रा

तपासणीसाठी खास भरारी पथकाची स्थापना : आरोग्य विभागाचे आदेश

पुणे – राज्यभरातील रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, बहुतांशी डॉक्‍टर मुख्यालयी राहातच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे, त्याची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार यापुढील कालावधीत असे प्रकार घडल्यास संबंधित अधिकारी अथवा डॉक्‍टरांवर कडक कारवाई करण्यात येइल, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. या तपासणीसाठी खास भरारी पथकाची स्थापना करण्यात येणार आहे, त्याबाबतचे आदेश प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आले आहेत.

राज्यातील विशेषत: दुर्गम भाग आणि खेड्यापाड्यातील रुग्णांना आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या राज्य शासनाच्या अंदाजपत्रकात आरोग्य विभागासाठी अधिकची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी खास सवलती देण्यात आल्या आहेत, त्याशिवाय औषधांचा साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

मात्र, सरकारी रुग्णालयातील डॉक्‍टर आणि कर्मचारी मुख्यालयी राहातच नसल्याचे आतापर्यंत निदर्शनास आले आहे. त्यामुळे रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे, विशेष म्हणजे या प्रकारामुळे अनेक रुग्णांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. तर वेळेवर आरोग्य सुविधा न मिळाल्याने अनेक नातेवाईकांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी दवाखान्यात अव्वाच्या सव्वा खर्च करावा लागला आहे. त्यासंदर्भात अनेक नातेवाईकांनी आरोग्य विभागाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या, त्याशिवाय राज्यातील आमदारांनी विधानसभेत हा प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यामुळे या प्रकाराची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने सर्व सरकारी रुग्णालयात तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये डॉक्‍टर अथवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक आणि प्रसंगी अन्य स्वरुपाची प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.
– डॉ. नितीन बिलोलीकर, उप संचालक, आरोग्य

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here