नवी दिल्ली – राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी राजस्थानमधून दोन उमेदवार जाहीर केले. मात्र, केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांना त्या राज्यातून पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (कॉंग्रेस) आणि भुपेंद्र यादव (भाजप) यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत ३ एप्रिलला समाप्त होणार आहे. तर, आमदार बनल्याने भाजपचे नेते किरोडीलाल मीना यांनी राज्यसभा सदस्यत्व सोडले.
त्यामुळे राजस्थानमधून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या ३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. सत्तारूढ भाजप २, तर कॉंग्रेस उर्वरित जागा जिंकू शकेल. ती बाब विचारात घेऊन भाजपने दोन उमेदवार जाहीर केले.
त्यामध्ये राजस्थानचे माजी मंत्री चुन्नीलाल गरासिया आणि माजी आमदार मदन राठोड यांचा समावेश आहे. भाजपने उमेदवार जाहीर केल्याने यादव यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले.
राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आलेल्या काही केंद्रीय मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे टाळून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची भाजपची रणनीती आहे. यादव त्यापैकीच एक मानले जात आहेत.