औरंगाबाद – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी एकही झाड कापले जाणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केले आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, उलट त्या ठिकाणी उत्तम जातीची स्वदेशी झाडे लावली जाणार आहेत. प्रियदर्शनी गार्डन येथे हे नियोजित स्मारक होणार आहे. त्या ठिकाणाची पहाणी मुख्यमंत्र्यांनी केली त्यावेळी ते बोलत होते.
ठाकरे स्मारकासाठी या गार्डन मधील एक हजार झाडे कापली जाणार असल्याचे ट्विट देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले होते. त्यावरून मोठेच वादंग निर्माण झाले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या औरंगाबाद महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना स्मारकासाठी एकही झाड पाडले जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना केल्या होत्या.
लातूर पाणी प्रश्न सोडविणार
दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल. उपलब्ध पाणी साठा वापराबरोबरच गरजे एवढे पाण्याचा योग्य पद्धतीने उपयोग करण्याबरोबरच विविध पाणीविषयक योजनांचा समन्वय करुन पाण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लातूर जिल्हा आढावा बैठकीत दिली. ठाकरे म्हणाले, पाझर तलाव निधी, कृष्णा खोरे आधी संदर्भात कायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करून तो अहवाल महाराष्ट्र जल परिषदेकडे पाठवण्यात येईल. त्याचप्रमाणे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जात असून देवणी या ठिकाणी गाईचे आंतरराष्ट्रीय पशु संशोधन केंद्रामार्फत दर्जेदार देवणी गायीचे वाण संवर्धनासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
आजच्या प्रियदर्शनी गार्डनच्या भेटीच्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियोजित स्मारकाचा आराखडा नेमका कसा असेल याची माहिती घेतली. ज्या संस्थेने हा आराखडा तयार केला आहे त्या संस्थेच्या प्रमुखांशीही त्यांनी या बाबत चर्चा केली. तसेच तेथे नवीन वृक्ष लागवडीबाबतही संबंधीतांना सुचना केल्या.