पुणे – गव्हाचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशात गव्हाचे उत्पादन अधिक झाले आहे. लॉकडाऊनमध्येही भुसार बाजारात नव्या गव्हाची आवक सुरू झाली आहे.
पहिल्या लॉककडाऊनच्या तुलनेत बाजारात मागणीच्या तुलनेत आवक जास्त होत असल्याने तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये गव्हाच्या दरात प्रतिक्विंटलमागे शंभर ते दोनशे रुपयांनी घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सध्या मध्यप्रदेशसह गुजरात, राजस्थान आणि राज्याच्या विविध भागातून गहू दाखल होत आहे.
खरीप हंगामात चालू वर्षी पावसाने उत्तम साथ दिलेली आहे. तसेच अनुकूल हवामानामुळे त्याचा फायदा रब्बीतील पिकांनाही मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या मध्यप्रदेशसह राजस्थान आणि गुजरातमधून 2496, लोकवन, तुकडी, 496 आदी गहू बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे. सध्या बाजारात दर्जानुसार प्रतिक्विंटलला 2,200 ते 3,100 रुपये भाव मिळत आहे.
देशाच्या विविध भागांतून गव्हाच्या दररोज 25 ते 30 गाड्या दाखल होत आहे. लॉकडाऊननंतर गव्हाची नियमित आवक सुरू होईल. यंदा देशभरात गव्हाचे उत्पादन चांगले झाले असून दर्जाही चांगला आहे. पहिल्याच्या तुलनेत लॉकडाऊनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये पुरवठा सुरळीत सुरू झाल्याने भाव पूर्वपदावर आले आहे. लॉककडाऊन उठल्यानंतर आवकेत आणखी वाढ होऊन भावात घसरण होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारात तेजीची शक्यता नाही.
– विजय मुथा, गव्हाचे व्यापारी