मुंबई – मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना पीएमएलए न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नसून त्यांची कोठडी 18 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे नवाब मलिक यांना रमजान महिनाही तुरुंगातच काढावा लागणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 4 एप्रिल म्हणजेच आज संपली. त्यानंतर पीएमएलए न्यायालयाने मलिक यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली. नवाब मलिकांना तुरुंगात बेड, अंथरूण आणि खुर्ची देण्यास न्यायालयाने आधीच परवानगी दिली आहे. तसेच नवाब मलिकांना हायपर टेन्शन आणि मधुमेहाचा त्रास असल्याने कमी मिठाचे घरचं जेवण देण्याची विनंतीही न्यायालयाने मान्य केली होती.
नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारीला अटक केली होती. दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये त्याच्यावर मनी लॉंड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे मुंबईचे प्रमुखही आहेत.
ते परभणी आणि गोंदिया जिल्ह्याचे प्रभारी मंत्रीही आहेत. नुकताच त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला होता. नवाब मलिकांच्या जामीन याचिकेवर सुनावणी करण्यात आली असता त्यांना 7 मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा 4 एप्रिलपर्यंत त्यांची कोठडी वाढवली होती, आता पुन्हा एकदा 18 एप्रिलपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.