नवी दिल्ली – सीबीआय प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने 2 जूनपर्यंत वाढ केली आहे. तत्पूर्वी, न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील निकाल गुरुवारी राखून ठेवला होता. मात्र आज न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्याचे समजते.
सिसोदिया यांनी यापूर्वी पत्नीच्या आजाराचे कारणही न्यायालयापुढे दिले होते. न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी जामीन याचिका निकाली निघेपर्यंत सिसोदिया आणि पत्नी यांच्यात प्रत्येक पर्यायी दिवशी दुपारी ३ ते ४ या वेळेत व्हर्च्युअल भेटीचे निर्देशही संबंधित तुरुंग अधीक्षकांना दिले.
तुरुंगाच्या नियमानुसार आभासी बैठक होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सीबीआय आणि ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये सिसोदिया सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नुकताच त्यांना ईडी प्रकरणातही जामीन नाकारण्यात आला होता.
सिसोदिया यांच्या पत्नी आजाराने त्रस्त
मनीष सिसोदिया यांच्या पत्नी सीमा सिसोदिया यांना अनेक दिवसांपासून मल्टीपल स्क्लेरोसिस या आजाराने ग्रासले आहे. मनीष सिसोदिया जेलमध्ये आणि त्यांचा मुलगा शिक्षणासाठी परदेशात गेल्यापासून त्या घरी एकट्या असतात. यामुळे त्या तणावाखाली असतात. या आजारामुळे त्याच्या शरीराच्या अर्ध्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे त्याला चालायला किंवा बसायला खूप त्रास होत आहे.