मुंबई – गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे हे नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. मुंबई एनसीबीचे माजी प्रमुख समीर वानखेडे यांची रविवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत सीबीआयसमोर चौकशी झाली. त्यांच्यावर सुपरस्टार शाहरुख खान यांच्या मुलाची कार्डेलिया क्रूझ प्रकरणातून सोडवणूक करण्यासाठी 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
आजच्या चौकशीसाठी वानखेडे सकाळी 10.30 वाजता वांद्रे-कुर्ला संकुलातील केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या कार्यालयात पोहोचले. सीबीआय कार्यालयात प्रवेश करताना वानखेडे यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. कालच सीबीआयने वानखेडे यांची पाच तास चौकशी केली होती.
काल साडेचार वाजता सीबीआय कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर वानखेडे यांनी कुटुंबीयांसह मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले. सीबीआयने वानखेडे आणि इतर चार जणांवर 11 मे रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तक्रारीवरून गुन्हेगारी कट आणि खंडणीची धमकी या गुन्ह्यांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने 22 मे पर्यंत अटक न करण्याचा दिलासा दिला आहे.