परवानगी घेतली नाही, सुरक्षेची साधने पुरवली नाहीत; अधिकारी, ठेकेदारावर गुन्हा

दापोडी येथील दुर्घटना प्रकरण

पिंपरी – ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात मातीचा ढिगारा अंगावर कोसळून झालेल्या अपघातात अग्निशामच्या जवानासह एका मजुराचा मृत्यू झाला. यातील मजुराच्या मृत्यू प्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदार, उपठेकेदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास दापोडी येथे घडली.

विशाल हणमंतराव शिंदे (वय 32, रा. मोशी) नागेश कल्याणी जमादार (वय 22, सध्या रा. फुगेवाडी. मूळ रा. कर्नाटक) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाटील कन्ट्रक्‍शनचे मालक एम. बी. पाटील, उप ठेकेदार अशोक माणिकराव पिल्ले, सुनील राम शिंदे, पर्यवेक्षक धंनजय सुधारक सगट आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्व संबंधित अधिकारी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी पिल्ले, शिंदे, सगट यांना अटक केली आहे. याप्रकरणी मयत नागेश यांचे वडील कल्याणी पिरप्पा जमादार (वय 56, गुलबर्गा, रा. कर्नाटक) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ महापालिकेचे ड्रेनेज लाइनचे काम सुरू आहे. याठिकाणी काम करीत असलेला कामगार नागेश जमादार यांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने ते दबले गेले. त्यांना काढण्यासाठी गेलेल्या सुरवसे आणि बडगे यांच्याही अंगावर मातीचा ढिगारा कोसळला. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अडकलेल्या सुरवसे आणि बडगे या दोघांची सुटका केली. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे खड्ड्याच्या किनाऱ्यावर असलेला मातीचा ढिगारा खड्ड्यात कोसळला आणि त्यात नागेश यांच्यासह अग्निशामक दलाचे तीन जवान दबले गेले. या दुर्घटनेत विशाल जाधव व नागेश जमादार यांचा मृत्यू झाला.

दुसऱ्या दिवशीही गर्दी कायम
दापोडी येथे ज्या ठिकाणी अंगावर मातीचा ढिगारा पडून अग्निशामक दलाच्या जवानासह दोघेजण मृत्यूमुखी पडले. रविवारी घडलेल्या या घटनेस बघ्याची गर्दी कारणीभूत ठरली. मात्र दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी घटनास्थळ पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत होते. मात्र पोलीस त्यांना हुसकावून लावत असल्याचे पहायला मिळाले.

विशालच्या मृत्यूची अकस्मात नोंद
नागेश जमादार याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाख्ल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अग्निशामक दलाचा जवान विशाल जाधव यांच्या मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.