दापोडी दुर्घटनेप्रकरणी द्विसदस्यीय समिती

पिंपरी – दापोडी येथे ड्रेनेज लाईन (मलनिस्सारण नलिका) टाकताना घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी महापालिकेतर्फे द्विसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या घटनेबाबत सह-शहर अभियंता मकरंद निकम यांनी प्राथमिक अहवाल सादर केला आहे. ठेकेदाराकडून याबाबत सविस्तर खुलासा मागविला आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्पष्ट केले.

दापोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ रविवारी मलनिस्सारण नलिका टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात मातीच्या ढिगाऱ्यात अडकल्याने नागेश जमादार आणि बचाव कार्यासाठी गेलेला अग्निशामक दलाचा जवान विशाल जाधव यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आयुक्‍त श्रावण हर्डीकर म्हणाले, घटनेची चौकशी करण्यासाठी शहर अभियंता राजन पाटील आणि सह-शहर अभियंता मकरंद निकम यांची द्विसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषीविरूद्ध कारवाई करण्यात येईल. सुपरवायझरच्या विरोधात पोलीसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव
संबंधित घटना रविवारी घडली आहे. निविदेतील अटी, शर्तीमध्ये स्पष्टपणे सुट्टीचे दिवशी ठेकेदाराने काम करू नये, असे म्हटले असताना ठेकेदाराने सुट्टीच्या दिवशी काम करण्यासाठी कामगारांना बोलविले. काम करताना सुरक्षिततेबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती. सुट्टीच्या दिवशी काम करण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी घेतली नाही, असे महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी संयुक्तपणे काढलेल्या प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे.

कुटुंबीयांना मिळणार विमा योजनेचा लाभ
अग्निशामक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी काढण्यात आलेला 10 लाख रुपयांचा विमा आणि राज्य सरकारच्या राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेतील 10 लाखांचा विमा अशी एकूण 20 लाख रुपयांची रक्‍कम जाधव यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे. तसेच जाधव यांच्या पत्नीला महापालिका सेवेत अनुकंपा तत्त्वावर सामावून घेण्याबाबत आयुक्तांसमवेत चर्चा झाली आहे. निविदेतील अटी, शर्तीनुसार ठेकेदाराने उतरविलेल्या कॉन्ट्रक्‍टर ऑल रिस्क विमामधून ठेकेदाराकडील कर्मचारी नागेश जमादार यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची रक्‍कम विम्यापोटी मिळेल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.