बिशप्स स्कूलच्या प्रांगणात लवकरच दिसून येणार विमान
पुणे – ध्वनीपेक्षाही अधिक वेगाने अवकाशात भरारी घेणारे आणि भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील पहिले लढाऊ विमान असलेले “मिग 21′ हे विमान आता पुण्यातील बिशप्स स्कूलमध्ये बसविण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या विरोधातील 1971 आणि 1999 सालच्या कारगील युद्धात मर्दुमकी गाजविणारे हे विमान आता या शाळेतील विद्यार्थ्यांना लष्करात रुजू होण्याची प्रेरणा देईल.
विद्यार्थ्यांना हवाई दलाचे महत्त्व आणि कार्य कळावे, तसेच सैन्यदलात भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी बिशप्स प्रशालेच्या प्रांगणात लवकरच “मिग-21′ हे लढाऊ विमान बसविण्यात येणार आहे. यासाठी प्रशालेला हवाई दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले असून, नुकतेच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फेही यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. बोर्डाच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत ही मंजुरी देण्यात आली. रशियन बनावटीचे “मिग-21′ हे सुपरसॉनिक म्हणजेच अत्यंत वेगवान प्रकारातील विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 1970 साली दाखल झाले. अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये या लढाऊ विमानाने महत्त्वाची कामगिरी केली आहे.
“मिग-21 बायसन’ हे या विमानाचे अत्याधुनिक स्वरूप असून नुकत्याच झालेल्या बालाकोट एअरस्ट्राइकनंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी “मिग-21 बायसन’ या विमानाने शत्रूच्या विमानाचा वेध घेत, थरारक कामगिरी केली होती. त्यामुळे तरुणाईमध्ये विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये लढाऊ विमाने आणि हवाई दल याबाबत अधिक कुतूहल निर्माण झाले आहे.
“बिशप्स प्रशालेतील अनेक माजी विद्यार्थी हे सैन्य दलात विशेषत: हवाई दलात वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. प्रशालेतील इतर विद्यार्थ्यांनाही अशाप्रकारच्या कामाची, देशसेवेची प्रेरणा मिळावी, प्रशालेची ही परंपरा पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी आम्ही हे विमान बसविणार आहोत. या कार्यासाठी आवश्यक परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच प्रत्यक्ष विमान बसविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.’
– जोएल एडविन, मुख्याध्यापक, बिशप्स प्रशाला