मिलिंद तुंगार यांनी व्यक्त केली भीती : बारामती एमआयडीसी येथे सैनिकांचा सन्मान
बारामती (प्रतिनिधी) – सैनिकांचे बलिदान व्यर्थ होऊ नये यासाठी शासनाने सर्व सोयी सवलती नियमानुसार दिल्या पाहिजेत, जर माजी सैनिकांकडे दुर्लक्ष झाल्यास सैन्यात जाण्यास कोणीही तयार होणार नाही व समाजात चुकीचा संदेश जाईल, अशी भीती पुणे जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचे अधिकारी निवृत्त मेजर मिलिंद तुंगार यांनी केले.
बारामती एमआयडीसी येथे जय जवान आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रममध्ये तुंगार बोलत होते. याप्रसंगी बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सैनिक संघटनेचे राज्य अध्यक्ष नारायण अंकुशे, राज्य महिला अध्यक्षा पुष्पा मुंडे, निवृत्त लेफ्टनंट व्ही. आर. जाधव, डॉ. लक्ष्मण आसबे, डॉ. रमेश भोईटे, अभिनेते घनश्याम येडे, नगरसेवक किरण गुजर, कमल कोकरे, बिरजू मांढरे, किशोर मासाळ, सागर आटोळे, पत्रकार प्रमोद ठोंबरे व राज्यातील आजी-माजी सैनिक संघटनांचे सर्व तालुकाध्यक्ष व शहीद परिवारचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी राज्यातील वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, सिमेवरील युद्धात जखमी झाले आजी-माजी सैनिक, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सैनिकांच्या पाल्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
आचार्य अकॅडमीच्या वतीने सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलत घोषित करण्यात आली व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील, स्वागत निवृत्त नाईक सुभेदार राजेंद्र चव्हाण तर राहुल भोईटे यांनी आभार मानले.
अन् उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू
सैनिकांनी जर विविध मागण्यांसाठी संप केला तर काय होईल याची कल्पना करा व सैनिकांचे बलिदान व्यर्थ होऊ नये म्हणून शासनाने व समाज्याने दक्षता घ्यावी हे सांगून शहीद सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची व्यथा सांगताना निवृत्त हवालदार विक्रम जगताप यांना अश्रू अनावर झाले नाही. त्याच्यासोबत सव उपस्स्थित व व्यासपीठावरील मान्यवरांच्या डोळ्यातही पाणी तरळले होते.
“नगरपरिषद सैनिकांच्या पाठीशी’
बारामती नगरपरिषदच्या वतीने आजी-माजी सैनिकांना घर, पाणीपट्टी बाबत सूट देऊ, अतिक्रमण झालेल्या जमिनी मिळवून देऊ, कार्यलयासाठी जागा उपलब्ध करून देऊ,माजी सैनिकांना नगरपरिषदेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक देऊ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने शासकीय स्तरावर विविध प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करू, अशी ग्वाही बारामती नगरपरिषदच्या वतीने नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व नगरसेवक किरण गुजर यांनी सर्व सैनिकांना दिली.