-->

इंदापूर, बारामतीत बिबटे किती?

वाढत्या हल्ल्यांमुळे वनविभागासमोर पेच कायम
भवानीनगर  (वार्ताहर)- गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून काटेवाडी, कण्हेरी भागांमध्ये बिबट्याने थैमान घातले होते. यामध्ये एक बिबट्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजऱ्यामध्ये कैद केला आहे; परंतु आता बारामती तालुक्‍याबरोबर इंदापूर तालुक्‍यातही बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याने आता बिबट्या इंदापूर तालुक्‍यातही आल्याचे निष्पन्न झालेले आहे. यामुळे बारामती आणि इंदापूर तालुक्‍यात नक्‍की किती बिबट्यांचा वावर आहे? हा प्रश्‍न वन विभागासमोर ही निर्माण झालेला असून त्यांना कसे जेरबंद करावे याच विचारात वन विभाग रात्रंदिवस कार्यरत आहे.

बारामती तालुक्‍यामध्ये बिबट्याने बोकड, शेळी, कुत्रा यावरती हल्ला करून जिवे मारून काही शेळ्यांना त्यांनी ऊसात घेऊन गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काहीजणांना बिबट्याचे अचानक दर्शनही झाल्याने ती व्यक्ती घाबरून शेतामध्ये जाणेही बंद केले होते. परंतु या सर्व घडामोडीवर बारामती वन विभाग आणि रेस्क्‍यू टीम त्याचप्रमाणे वनाधिकारी यांनी बिबट्याच्या हल्ल्या बाबतचा गंभीर विचार करून या भागांमध्ये पिंजरे लावल्याने या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या अडकला गेला.

बिबट्या पकडून देखील या भागांमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. नक्कीच या भागांमध्ये अजूनही बिबट्याची मादी किंवा तिची बछडे असण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याचा दुजोराही वन विभागाने दिला आहे. त्यामुळे ही बिबट्या जातीची मादी पकडणे वन विभागासमोर आव्हान निर्माण झालेले आहे. बारामती तालुक्‍यातील काटेवाडी, कण्हेरी या भागांमध्ये बिबट्याचे हल्ले होत असताना इंदापूर तालुक्‍यातील बेलवाडी येथील भाऊसाहेब पवार यांच्या राहत्या घरासमोरील गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून त्या शेळीस मारून शेळीचा काही भाग खाऊन बिबट्याने तेथून पलायन केले. या सर्व गोष्टींमुळे बारामतीत तालुक्‍यातून इंदापूर तालुक्‍यामध्ये बिबट्याने पलायन केले आहे. बारामती तालुक्‍यामध्ये असलेले बिबटे वेगळे आहेत. आणि इंदापूर तालुक्‍यात असलेले बिबटे वेगळे आहेत का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या बारामती आणि इंदापूर तालुक्‍यामध्ये बिबट्याने दहशत निर्माण केली असून नक्की हे वन्य प्राणी या भागांमध्ये कुठून आले असावेत हाच प्रश्‍न सर्वांना पडलेला आहे. काटेवाडी व कण्हेरी भागांमध्ये बागायती शेती असल्याने त्याचप्रमाणे या भागातून नीरा डावा कालवा गेला आहे. नीरा डावा कालव्याच्या बाजूला गर्द झाडी असून याच परिसरामध्ये उसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.

…म्हणून तो वळला मानवी वस्तीकडे
संपूर्ण राज्यात सध्या जंगल उरले नसून वन्य प्राणी ज्या जंगलात राहतात. त्याही ठिकाणी काही भागांमध्ये नागरिकांनी सिमेंटची जंगले उभा केल्याने जगण्याचा मार्ग शोधण्यासाठी बिबट्या सारख्या वन्यप्राण्यांनी मानवी वस्तीकडे धाव घेतली आहे. निसर्गाचे कालचक्र हे मानवाने प्रत्येक ठिकाणी अतिक्रमणकरून उद्‌ध्वस्त केल्याने आज निसर्गाचा समतोल ढळत चाललेला आहे. यापुढील काळात जसजशी सिमेंटचे जंगल तयार होतील तसे हे वन्यप्राणी गावाकडे धाव घेऊन गावातील पाळीव प्राणी आपली शिकार बनवत जातील, अशी भीती सध्यातरी या बिबट्याने केलेल्या हल्ल्यावरून निदर्शनास येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.