अभिनेता संजय कपूरने दुसरी इनिंग ओटीटीवर सुरू केली आहे. त्यात त्याला काही चांगल्या भूमिकाही मिळत आहेत. 26 वर्षांपूर्वी प्रेम या चित्रपटाद्वारे पदार्पण करणाऱ्या संजयने नंतर कर्तव्य, राजा यासारखे चांगले चित्रपट दिले.
पण नंतर म्हणावी तशी त्याची गाडी धावली नाही. त्याने चाळीसएक चित्रपट केले. त्यातील ज्युली, औजार आदींची चर्चा झाली. पण नंतर त्याने अभिनय सोडून निर्मितीकडे लक्ष दिले.
अनिल आणि बोनी यांचा धाकटा भाऊ असलेल्या संजयची कन्या शनाया आता चित्रपटांत पदार्पणाच्या तयारीत आहे. त्यामुळे शनायाला काही सल्ला देणार असे विचारल्यावर तो म्हणतो की ती 21 वर्षांची आहे.
या वयात मी होतो त्यापेक्षा आताची पिढी जास्त स्मार्ट आहे. तिने लहानपणापासून मला पाहिले आहे. आमच्या कुटुंबातील इतरही सदस्य चित्रपटांत आहेत. त्यांनाही तिने जवळून पाहिले आहे.
त्यामुळे काय करायचे हे तिला सांगण्याची गरज नाही. ते तिला सगळेच माहिती आहे. एकमात्र नक्की हल्लीच्या काळात स्टारडम लवकर मिळते.
मात्र ते ज्या वेगात मिळते, त्या वेगात निघूनही जाते. कारण अनेक लोक या इंडस्ट्रीत येत आहेत, प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुम्हाला जर टिकून राहायचे असेल तर कष्ट घेण्याशिवाय पर्याय नाही. शानाया समजूतदार आहे. तिला हे सगळे माहिती आहे.