पाटण – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगली जयगड भागात गस्त घालत असताना दुर्मिळ ग्रिफॉन गिधाड आढळून आले आहे. वनक्षेत्रपाल स्नेहल मगर व वनरक्षक संतोष चाळके यांना हा पक्षी जंगली जयगड परिसरात उडताना घिरट्या मारताना दिसला. दुर्मिळ ‘ग्रिफॉन गिधाड’ सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सापडल्याने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी असून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वैभवात यामुळे भर पडली आहे.
दुर्मिळ पक्षी ग्रिफॉन गिधाड हा सहजासहजी भारतात आढळून येत नाही. तो प्रामुख्याने तिबेट कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ते हिमालय नेपाळ, भूतान ते पश्चिम चीन आणि मंगोलिया दक्षिणेकडील युरोप, उत्तर आफ्रिका या भागात मुख्यत्वे आढळतो. हजारो किलोमीटरचा हा प्रवास करत असतो. आकाशात उंच घिरट्या घालत आपले अन्न शोधत असतो. या पक्ष्याचे इंग्रजी नाव ‘ग्रिफॉन वलचर’ शास्त्रीय नाव गीप्स फुल्वस असे आहे हा एक अत्यंत मोठा पक्षी असून त्याची उंची साधारणपणे १२५ से.मी. असते. तर दोन पंखांची लांबी साधारण ८ ते ९ फुटापर्यंत भरते. नर व मादी ग्रिफॉन गिधाडाचे वजन ८ ते १० किलोपर्यंत नोंदवले गेले आहे.
ही एक दुर्मिळ गिधाड प्रजाती आहे. ज्याचे डोक्यावर पंख पांढरे शुभ्र असतात तर पाठीवरचे पंख फार रुंद व तांबूस असतात व शेपटीचे पंख हे डार्क चॉकलेटी असतात. इतर गिधाडांप्रमाणेच हा स्केवेंजर ( कुजलेले व सडलेले मांस खाणारा) आहे. उंच कड्यांवर राहण्यासाठी घरटे बनवतात जेणेकरून भक्ष्य अन्न सहज शोधता येईल अशा ठिकाणी वास्तव्य हा पक्षी करतो.
तिबेट, कझाकिस्ता, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ते हिमालय नेपाळ, भूतान ते पश्चिम चीन आणि मंगोलिया दक्षिणेकडील युरोप, उत्तर आफ्रिका येथील पर्वतांमध्ये ते प्रजनन करतात आणि एक अंडे देतात.
या पक्ष्याचे फोटो अभ्यासासाठी पक्षी तज्ञ व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचे क्षेत्रसंचालक समाधान चव्हाण, उपसंचालक उत्तम सावंत , सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी वनक्षेत्रपाल स्नेहल मगर व संतोष चाळके यांचे ह्या दुर्मिळ नोंदणीसाठी कौतुक व अभिनंदन केले आहे.
हे गिधाड शास्त्रीय व स्थलांतराच्या अभ्यासासाठी कोणत्यातरी अभ्यासकाने हे टॅग लावून सोडलेले आहे, त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या देशात गिधाडांवर अभ्यास करणाऱ्या संशोधकांना व गिधाडां वर अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थाना संपर्क करून त्यांना या नोंदीची माहिती आम्ही कळवली आहे, असे पक्षी तज्ज्ञ व मानद वन्यजीव रक्षक रोह भाटे यांनी सांगितले.