धरण काठावरील मासेमारी करणाऱ्यावर संक्रांत
पळसदेव -उजनी धरणात सध्या मासा मिळेनासा झाला आहे, त्यामुळे उजनी काठावरील मासेमारी करणाऱ्यावर संक्रांत आली आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांतील मच्छिमारांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. मासेमारी सोडून दुसरा व्यवसाय करण्याची वेळ मासेमारांवर आली असल्याचे मत मच्छिमारांचे आहे. उजनी धरणात सध्या केवळ चिलापी जातीचे मासे तेदेखील थोड्या प्रमाणात मिळत आहे.
सध्या 30 ते 40 किलो जाळी टाकली तर केवळ 3 ते 4 किलोच मासे मिळत आहे. अनेक वेळा जाळी अगदी मोकळीच निघत आहेत, त्यामुळे मासेमारांवर रोजीरोटी चालवण्यासाठी मासेमारी सोडून शेतमजूर म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. इंदापूर तालुक्यातील मच्छिमार लोणी देवकर, एमआयडीसीमध्ये रोजंदारीवर काम करीत आहेत. उजनी काठावर अनेक दिवसांपासून परप्रांतीय मच्छिमारांनी लहान लहान मत्स्यबीज पकडून नेल्याने उजनीत मासेच सापडत नसल्याचे चित्र आहे. मासा मिळत नसल्याने या भागातही माशांचे भावही गगनाला भिडले आहेत.
मत्स्यबीजांची परप्रांतीयांकडून विक्री
अनेक दिवसांपासून बंदी असतानादेखील परप्रांतीय मच्छिमारांनी मत्स्यबीज पकडून नेले आहेत. या भागातील मार्केटमध्ये असे मत्स्यबीज खरेदी-विक्रीस बंदी आहे; पण हे मच्छिमार या भागातील काही दलालांच्या मदतीने इतर ठिकाणी या मत्स्यबीजाची पोत्यात भरून विक्री करत आहेत. लहान लहान मासे पकडण्याचा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून बिनबोभाट सुरू असल्याने मोठे मासे मिळणे दुरापास्त झाले आहे. दरवर्षी उजनी व्यवस्थापन विभागाकडून उजनीत मत्स्यबीज सोडण्यात दिरंगाई आणि ठरलेल्या कोट्यापेक्षा कमी मस्त्यबीज सोडले जात असल्याने उजनीतील मासा कमी झाला आहे. उजनी काठावरील अनेक गावात मोठंमोठी मांगूर माशांची तळी करून अनेक मच्छीमारांनी मांगूर पालनाबरोबर उजनीतील मच्छबीज मारण्याचा सपाट या लावला आहे.
अंकुश ठेवण्यास धरण व्यवस्थापन अपयशी
उपकार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन विभाग यांच्या वतीने उजनी काठावरील सर्व आडते व व्यापारी यांना लहान मासळी खरेदी करण्याबाबत बंदी घातली असून, असे केल्यास गुन्हा दाखल केला जाईल आशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत. मात्र, परप्रांतीय मच्छीमार या मासळीचे जिल्ह्याबाहेर बाजारपेठेत वाळवलेली मासळी विक्रीस पाठवत आहे. त्यामुळे या मच्छिमारांवर अंकुश ठेवण्यास उजनी धरण व्यवस्थापन विभाग अपयशी ठरला आहे.