नारायणगाव -मांजरवाडी (ता. जुन्नर) गावात मुंबईहून आलेली 35 वर्षीय महिला करोना पॉझिटिव्ह आढळल्याने मंगळवारी (दि. 26) पासून संपूर्ण मांजरवाडी गाव पुढील 14 दिवसांसाठी कंटेन्मेंट झोन म्हणून, तर या गावापासून 5 किलोमीटरचा परिसर बफर झोन घोषित करण्यात आला आहे.
या परिसरात 24 तास नाकाबंदी सुरू असून पुणे, मुंबई व बाहेर गावावरून येणाऱ्यांनाना प्रवेश बंदी असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य माउली खंडागळे व पोलीस पाटील सचिन टाव्हरे यांनी दिली.
मांजरवाडी येथे एक महिला करोनाबाधित असल्याचे सोमवारी (दि. 25) आढळून आली. हा अहवाल मिळताच तहसीलदार हनमंत कोळेकर, गटविकास अधिकारी विकास दांगट, वारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ आणि तालुका प्रशासनाने सायंकाळी मांजरवाडीला भेट देऊन हा परिसर सील केला आहे.
मंगळवारी दुपारी या परिसराला उपविभागीय अधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी भेट देऊन पाहणी केली. मांजरवाडीमध्ये या महिन्यात सुमारे 100 पेक्षा जास्त नागरिक मुंबईहून वास्तव्यसाठी आले आहेत. या संदर्भात ग्रामपंचायत विभाग व आरोग्य विभागाने त्यांना होम क्वारंटाइनचे आदेश दिले आहेत.
तर गावातून भाजीपाला काढण्यासाठी महिला मजूर गावाबाहेर घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. जे वाहक महिला मजुरांना बाहेरगावी घेऊन जाती, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मांजरवाडी गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.
35 वर्षीय करोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 6 नातेवाइकांचे मंगळवारी जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री येथे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले असून, त्यांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
– डॉ. वर्षा गुंजाळ, वैद्यकीय अधिकारी, जुन्नर