तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – सोमाटणे टोल नाक्यावर वाहतूक कोंडी नित्याचीचशनिवार ते सोमवार अशा सलग तीन सुट्ट्या संपवून माघारी फिरलेल्या पर्यटकांच्या वाहनांना टोलनाक्यांवरील रांगांमुळे काहीकाळ ब्रेक लागला.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे आणि वरसोली टोल नाक्यांवर सोमवारी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले सलग तीन सुट्ट्यांमुळे मावळात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीचा अडसर आला होता.
सलग तीन शासकीय सुट्ट्यांमुळे मावळमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. शनिवार, रविवार लोणावळा, खंडाळा, पवनानगर, कार्ला, भाजे, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा आधी ठिकाणे पर्यटकांनी भरून गेली होती. साधारण सोमवारी (दि. १७) दुपारपासूनच पर्यटकांचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यामुळे सर्वठिकाणची वाहने प्राधान्याने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.
पोलिस प्रशासनाने आगाऊ नियोजन केले होते, तरीही वाहनांची संख्या वाढल्याने त्यांचीही दमछाक झाली. टोलनाक्यां बरोबरच तळेगाव फाटा, वडगाव फाटा, कामशेत फाटा आणि कार्ला फाट्यावर वाहतूक कोंडीने सर्वांना छळले. अतिउत्साही वाहनचालक आपल्या कृतीने यात भर घालत राहिले.