शासकीय कार्यालयात बिनकाम्यांना “नो एन्ट्री’

महापालिकेत केवळ नगरसेवकांनाच प्रवेश; आयुक्‍तांकडून आदेश जारी

पुणे – करोनाचे नवीन रुग्ण वेगाने वाढत असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये “बिनकामी’ होणारी गर्दी रोखण्याकरिता महापालिकेसह, पालिक हद्दीतील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये केवळ सभासद आणि पदाधिकारी आणि पूर्वनियोजित वेळ घेऊन बैठकीसाठी येणाऱ्या नागरिकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी रात्री उशिरा काढले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. राज्यशासनाने याबाबतचे आदेश दिल्यानंतर महापालिका आयुक्‍तांकडून याबाबत आदेश काढण्यात आले आहेत.

करोनाच्या दैनंदिन बाधित रुग्णांचा आकडा तीन हजारांवर गेला आहे. यातून प्रतिबंध लावण्यात आल्यानंतरही नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे, त्यात शासकीय कार्यालयेही मागे नाहीत. महापालिकेसारख्या शासकीय कार्यालयांमध्ये दैनंदिन कामांव्यतिरिक्‍त येणाऱ्या नागरिकांसोबतच लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते तसेच पुढील वर्षात महापालिका निवडणुका असल्याने अनेक इच्छुक मोठ्या प्रमाणात महापालिकेत गर्दी करत आहेत.

तर, 31 मार्चमुळे शासकीय कार्यालयांमध्ये ठेकेदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची वर्दळही वाढली आहे. यातून शासकीय कर्मचारी बाधित होत असताना गर्दीतून करोना प्रादुर्भावातून बाधितांचा आकडाही वाढत आहे. परिणामी शासकीय कार्यालयात आता केवळ लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच संबंधित विभाग प्रमुखांनी बाहेरील व्यक्तींना पासची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार आहे.

पालिकेतही 50 टक्‍के उपस्थिती?
राज्यशासनाने शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्य कर्मचारी उपस्थितीबाबत संबंधित प्रमुखांनी निर्णय घ्यावा, असे आदेश काढले आहेत. त्याच धर्तीवर महापालिकेतही 50 टक्के उपस्थितीचा निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे. याबाबत महापालिका आयुक्‍त स्तरावर उद्या चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.