पिंपरी – भारत-इंग्लंड क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन माध्यमातून बेटिंग घेणा-यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना बेटिंग घेणा-यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 26) रात्री मामुर्डी, घोरावडेश्वर डोंगर आणि विमाननगर येथील एका हॉटेलमध्ये घडली. पोलिसांनी याप्रकरणी 33 जणांना अटक केली आहे.
कार्तिक राजकुमार चावला (वय 28, रा. पटेलनगर, नवी दिल्ली), गोविंद राजेश मणिहार (वय 31, रा. नागपूर), गौरव हरीश वाघवा (वय 30, रा. सोनीपथ, हरियाणा), रेमंड सामुअल कयादो (वय 21, रा. गोवा), अमित सुभाष चौधरी (वय 25, रा. इंदोर, मध्यप्रदेश) आणि अन्य 28 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस नाईक सागर सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी भारत-इंग्लंड यांच्यात क्रिकेट सामना झाला. या क्रिकेट सामन्यावर भोपाळ येथील मुख्य बुकी भोलू आणि नागपूर येथील मुख्य बुकी चेतन उर्फ सोनुडावर यांच्यासाठी आरोपींनी ऑनलाईन माध्यमातून बेटिंग घेतली. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मामुर्डी येथील एका बांधकाम साईटवर, घोरावडेश्वर डोंगरावर तसेच विमाननगर येथील एका हॉटेलवर कारवाई करून 33 जणांना अटक केली.
पोलीस कारवाईसाठी गेले असता आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की करून मुक्कामार देऊन जखमी केले. तसेच पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच आरोपींनी करोना साथीचा आजार पसरण्यासाठी देखील हायगयीचे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.