पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे शहरातून सोलापूर, नगर, सातारा, मुंबई, नाशिक, सासवड, पौड, आळंदी या आणि इतर रस्त्यांवरून शहरात येत दुसऱ्या शहरांकडे जाणारी व येणारी सर्व प्रकारची जड, अवजड माल वाहतूक करणाऱ्यांना यापुढे बंद करण्यात आली आहे. ट्रक व इतर वाहनांनी येताना व जाताना शहरामधील अन्य मार्ग वापरण्यास दि. २३ मार्चपासून पूर्ण वेळ बंदी करण्यात आली आहे.
या वाहतूक मार्ग बदलाबाबतचे आदेश पुणे शहर पोलीस उपआयुक्त (वाहतूक) रोहिदास पवार यांनी जारी केले आहेत. शहरात वाढलेल्या वाहन संख्येमुळे वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय, जड वाहनांमुळे अपघातही वाढले आहेत. तसेच मेट्रो, उड्डाणपूल आदी विविध मोठे प्रकल्प व विकासकामे सुरू आहेत. या सर्व स्थितीमुळे रस्त्यावरील जागा मोठ्या प्रमाणात व्यापली जाऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आहे. यामुळे नागरिकांना मोठा धोका व गैरसोय असल्याने ती टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल केले आहेत.
अंतर्गत रस्त्यांवर जड, अवजड वाहनांना २४ तास प्रवेश बंद-
पुणे शहरातील मंगलदास रस्त्यावरील ब्ल्यु डायमंड चौक ते सर्किट हाऊस चौक, रेंजहिल्स् रोडवरील पोल्ट्री फार्म चौक ते रेंजहिल्स कॉर्नर चौक, सर मानेकजी मेहता रोडवरील काहुन रोड जंक्शन ते कौन्सिल हॉल चौक, पुणे स्टेशन रोडवरील जहांगीर हॉस्पिटल चौक ते अलंकार सिनेमा चौक या अंतर्गत रस्त्यावर जड अवजड माल वाहतूक करणारे ट्रक, डंपर, मिक्सर, बल्कर, जे.सी.बी., रोड रोलर वाहनांसाठी प्रवेश बंद राहील.
नगर रस्त्यावरून सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद :
– पिंपरी चिंचवड, मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, होळकर पूल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पूल मार्ग बंद. वाहनचालकांनी शिक्रापूर, चाकण, तळेगाव या पर्यायी मार्गे जावे
– साताऱ्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांकरीता खराडी वायपास चौक, मगरपट्टा रोड, सासवड रोडने मंतरवाडी फाटा चौक, खडी मशीन चौक, कात्रज चौक मार्ग बंद राहील. वाहनचालकांनी लोणीकंद, केसनंद, थेऊर, थेऊर फाटा तसेच शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुला, लोणंद किंवा सुपा, जेजुरी या पर्यायी मार्गांनी जावे.
– सोलापूरकडे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना खराडी बायपास चौक, मगरपट्टा रोड, हडपसर मार्ग बंद. वाहनचालकांनी शिरूर, नाव्हरा, केडगाव चौफुला मार्गे जावे.
सोलापूर रस्त्यावरील वाहनांसाठी…
नगर व नाशिककडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी हडपसर, मगरपट्टा रोड, खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. बाबासाहेव आंबेडकर चौक, होळकर पूल, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस पुल मार्ग बंद राहणार. त्यांच्यासाठी थेऊर फाटा, थेऊर, केसनंद, लोणीकंद, शिक्रापूर मार्गे तसेच केडगाव चौफुला, नाव्हरा, शिरूर हे पर्यायी रस्ते असतील.