पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभा सदस्य बनण्यास उत्सुक असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली. त्याविषयी नितीश यांनी सोमवारी मिश्कील प्रतिक्रिया दिली. काहीही छापून येते. त्या बातमीने मीसुद्धा चकित झालो, असे त्यांनी म्हटले.
मागील महिन्याच्या अखेरीस नितीश यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. मी बिहार विधानसभा आणि विधान परिषदेचा सदस्य बनलो. लोकसभेवरही मी निवडून गेलो. राज्यसभा सदस्य बनल्यास माझा राजकीय प्रवास पूर्ण होईल, असे त्या गप्पांवेळी म्हणाले. त्या वक्तव्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आले. नितीश पुढील उपराष्ट्रपती बनू शकतात.
त्यासाठी ते मुख्यमंत्रिपद भाजपकडे सोपवतील, अशा आशयाची बातमीही प्रसिद्ध झाली. मात्र, ती बातमी निराधार आणि केवळ अंदाज असल्याचे नितीश यांनी येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले. बिहारमध्ये नितीश यांचा जेडीयू आणि भाजप एकत्रितपणे सत्तेवर आहे.
त्या राज्यात 2020 या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये जेडीयू-भाजप युतीने बाजी मारली. मात्र, प्रथमच जेडीयूपेक्षा अधिक जागा भाजपने मिळवल्या. त्यानंतरही नितीश यांच्याकडे मुख्यमंत्रिपद कायम ठेवण्यास भाजप राजी झाला.