नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. कारण काही महिन्यांपूर्वी झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणे नवीन हत्याकांड उघडकीस आले आहे. एका तरुणीची हत्या करण्यात आली. एवढंच नाही तर तिच्या शरिराचे तुकडे-तुकडे करून शहराजवळील एका पुलाजवळ फेकून दिल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याचा तपासही सुरु करण्यात आला आहे.
राजधानी दिल्लीतील गीता कॉलनी उड्डाणपुलाजवळ मुलीचा मृतदेह तुकड्यांमध्ये सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली. मुलीच्या मृतदेहाचे डोके, तर शरीराचे काही अवयव सापडले आहेत. यानंतर पोलिसांनी उड्डाणपुलाला लागून असलेल्या जंगलात शोधमोहीम सुरू केली आहे.
#WATCH | Delhi Police recovers the body of a woman, chopped into several pieces from near Geeta Colony flyover area. Police present at the spot.
More details are awaited. pic.twitter.com/F68RdUaifx
— ANI (@ANI) July 12, 2023
पोलिस ठाण्याजवळील जंगलात मृतदेहाचे काही भाग सापडल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलीस आजूबाजूला कसून तपास मोहीम राबवत आहेत. अशा प्रकारे उड्डाणपुलाजवळ मृतदेह आढळून आल्याने इथल्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहेत. अजूनही मुलीच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून खून आणि नंतर मृतदेहाचे तुकडे करण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यातील सर्वात प्रसिद्ध होते ते श्रद्धा खून प्रकरण. श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. गेल्या वर्षी 18 मे रोजी दिल्लीतील मेहरौलीमध्ये श्रद्धाचा प्रियकर आफताब याने तिची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. यानंतर मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले.