अहमदाबाद – भारतीय जनता पक्षाने आपली लोकसभा ( Lok Sabha Election 2024) उमेदवाराची पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपला आणखी दोन धक्के बसले आहेत. यावेळी भाजपचे गुजरातमधील मेहसाणा मतदार संघाचे उमेदवार व माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि उत्तर प्रदेशातील विद्यमान खासदार यांनी आपण आपली उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा एक्सवर केली आहे.
कालच भाजपने पश्चिम बंगाल मधील असनसोल लोकसभा मतदार संघातून ज्यांना अधिकृतपणे पक्षाची उमेदवारी जाहीर केली होती, ते भोजपुरी कलाकार पवनसिंह यांनी निवडणुकीआधीच या लढतीतून माघार घेतली. त्यासाठी त्यांनी कोणतेही कारण दिलेले नाही. आपण व्यक्तीगत कारणाने हा निर्णय घेतला आहे असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांच्या पाठोपाठ ज्येष्ठ भाजप नेते नितीन पटेल यांच्या माघारीची बातमी धडकली आहे. त्यांनी मेहसाणा मधून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाकडे अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांच्या उमेदवारीविषयी अधिकृतपणे निर्णय होण्याच्या आधीच त्यांनी आपण आपला इच्छुक म्हणून पक्षाकडे दाखल केलेला अर्ज माघारी घेत आहोत असे म्हटले आहे.
कालच नवी दिल्ली मतदार संघातील भाजपचे विद्यमान खासदार व माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांना पक्षाने उमेदवारी नाकारताच त्यांनी सरळ राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भाजपच्या या पहिल्या यादी विषयी आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनीही याची संधी साधत भाजपवर निशाणा साधला आहे. असनसोल मधून पवनसिंह यांच्या माघारी प्रतिक्रीया देताना तृणमुल कॉंग्रेसने खेला होबे अशा खोचक शब्दात आपली प्रतिक्रीया नेांदवली आहे.
बाराबंकीच्या उमेदवाराचीही माघार –
उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील उपेंद्र सिंह रावत यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांचा एक अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. रावत हे विद्यमान खासदार आहेत. माझा एक एआय तंत्राने एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल केला जातो आहे. मी एफआयआर दाखल केली असून राष्ट्रीय अध्यक्षांना विनंती केली आहे की या प्रकाराची चौकशी करा. जोपर्यंत मी निर्दोष असल्याचे सिध्द होत नाही तोपर्यंत मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही असे रावत यांनी म्हटले आहे.