मुंबई – भाजपा नेते नितेश राणे नेहमीच शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षावर जोरदार हल्लाबोल करत असतात. यातच नितेश राणेंनी राणीबागेसंबंधी केलेल्या ट्वीटनंतर शिवसैनिकांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.
तमाम #हिंदूच्या मॅांसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी मा. बाळासाहेबांच्या #ShivSena चं नाव बदलणार का? @UdhavThakre @mybmc pic.twitter.com/kjh2LAVCQp
— nitesh rane (@NiteshNRane) December 22, 2021
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. नितेश राणे यांनी ट्विट केले आहे की,’तमाम हिंदूच्या मॅांसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेले वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले आहे. आता सत्तेच्या लाचारीसाठी मा. बाळासाहेबांच्या शिवसेनचं नाव बदलणार का ?’
या ट्विटवरून संतापलेल्या शिवसैनिकांकडून आमदार नितेश राणे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी चूकीची माहीती ट्विटरद्वारे पसरवल्याच सांगत काल रात्री मुंबईतल्या वरळी, भोईवडा, काळाचौकी आणि भायखळा पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, किशोरी पेडणेकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या,'”ही कोनशिला अचानक आलेली नाहीये. राणीचा बाग मी स्वत: जावून पाहिली आहे. तिथे पीर बाबा हे अतिशय जुनं स्थान आहे. ते एकाबाजूला आहे. त्यामुळे वीर जीजामाता राणीचा बाग हे नाव पीर बाबा नावाने बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या इतक्या छोट्या-छोट्या गोष्टींवरुन राईचा पर्वत करत असतील तर आश्चर्य आहे. मुळात ही कोनशिला तिथे आहेच. तिथे पीर बाबांचं स्थान आहे. ते आज आणि काल नाही झालंय. ते अनेक दिवसांपासून आहे. तिथे हिंदू-मुस्लिम सगळे जातात” असेही त्या म्हणाल्या आहे.