लखनौ: निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना मला फासावर लटकवायचे आहे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंह यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवण्याची मागणी देशभरातून जोर धरू लागली आहे. तिहार कारागृहात असणाऱया या चारही आरोपींना एकत्र फाशी देण्याची तयारी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंह यांनी या आरोपींना महिलेच्या हातून फासावर लटकविण्याची मागणी रक्ताने लिहिलेल्या पत्रातून केली आहे.
वर्तिका सिंह यांनी पत्रात म्हटले आहे की, निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना महिलेच्या हातून फाशी देण्यात यावी, त्यासाठी मी तयार आहे. महिलेच्या हातून आरोपींना फाशी देण्यात आली तर देशात वेगळा संदेश जाईल. माझ्या मागणीला महिला कलाकार आणि महिला खासदारांनी पाठिंबा द्यावा. त्यामुळे समाजात सकारात्मक बदल होतील, अशी मला आशा आहे, असे वर्तिका सिंह यांनी पत्रात म्हटले आहे.