पर्थ : ऑस्ट्रोलिया आणि न्यूझीलंड दरम्यान पर्थ मध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रोलियाने न्यूझीलंडवर २९६ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. दिवस-रात्र कसोटीत मिशल स्टार्कच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज तग धरू शकले नाही आणि त्यांचा संघ दोन्ही डावात ऑलआउट झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा समावेश असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशीच न्यूझीलंडवर मोठ्या धावांच्या अंतराने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
It's all over in Perth!
New Zealand have lost their last five wickets for 17 runs in just over six overs, and Australia take a 1-0 lead inn the series 🏆 #AUSvNZ | SCORECARD 👇 https://t.co/lywZNrst6O pic.twitter.com/hBNV3c2u6t
— ICC (@ICC) December 15, 2019
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने लबुशेनच्या १४३ आणि ट्रेविस हेडच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ४१६ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात न्यूझीलंडकडून टीम साउदी आणि नील वैगनरने प्रत्येकी ४ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात फलंदाजीस मैदानावर उतरलेला न्यूझीलंड संघ पहिल्या डावात अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. राॅस टेलरच्या ८० धावांच्या जोरावर न्यूझीलंड पहिल्या डावात १६६ धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात स्टार्कने सर्वाधिक ५ गडी बाद केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव राॅरी बर्न्स आणि लबुशेनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ९ बाद २१७ वर घोषित केला आणि पहिल्या डावातील २५० धावांच्या आघाडीसह न्यूझीलंडसमोर विजयासाठी ४६८ धावांचे लक्ष्य ठेवले.
मात्र ४६८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघातील फलंदाजांचा ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही आणि त्यांचा दुसरा डाव अवघ्या १७१ धावांवर आटोपला. दुस-या डावात न्यूझीलंडकडून बी जे वॅटलिंगने ४० आणि काॅलिन ग्रैंडहोमने ३३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून दुस-या डावात स्टार्क आणि लायनने प्रत्येकी ४ गडी बाद केले. सामन्यात एकूण ९ गडी बाद करणा-या मिशेल स्टार्कला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.