नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला भालाफेकीत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या निरज चोप्राने आगामी डायमंड लीग स्पर्धेतून माघार घेतली आहे. टोकियोतून परतल्यावर निरज सातत्याने सत्कार समारंभ तसेच विविध सोहळे यात उपस्थित राहात होता, त्यामुळे त्याला डाएट तसेच सराव या सगळ्या गोष्टींसाठी वेळच मिळाला नाही. हेच सगळे सोहळे त्याला भोवले असल्याने त्याने या लीगमधून माघार घेतली आहे.
त्याच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशाचे पंतप्रधान मोदींपासून अनेकांनी त्याचा सन्मान केला. आता समारंभ नीरजला महागात पडले आहेत. मागील काही दिवस सतत विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यामुळे नीरजचे डायट, सराव नियोजन बिघडले.
त्यातच एका कार्यक्रमात त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयातही दाखल केले गेले होते. आता त्याची प्रकृती ठीक असली तरीही पुरेसा सराव करता आला नसल्याने त्याला या मानाच्या लीगमधून माघार घ्यावी लागत आहे.
ऑलिम्पिकनंतर आता सुरू होत असलेल्या नव्या मोसमाला प्रारंभ होत असतानाच निरजला या पहिल्याच स्पर्धेत खेळता येणार नसल्याने त्याच्यासह क्रीडा शौकिनांचीही निराशा झाली आहे.