लोणी काळभोर/ सोरतापवाडी -उरुळी कांचन (ता. हवेली) येथील हद्दीत 24 तासांत करोनाचे 9 नवीन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे गावातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 37 वर पोहोचली आहे.
उरुळी कांचन येथे बुधवारी (दि. 8) रात्री उशीरा 4 तर गुरुवारी दुपारपर्यंत नव्याने 5 बाधित आढळून आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी दिली आहे. मागील 2 दिवसांत तब्बल 21 रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची स्वॅब (घशातील द्रव) तपासणी सुरू केल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे.
मात्र, यापुढील काळात रुग्ण वाढू नयेत यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने पोलिसांच्या मदतीने उपाययोजना सुरू केले आहेत. उरुळी कांचन येथील एक साठ वर्षीय सराफ व्यावसायिक रविवारी (दि.5) बाधित असल्याचे आढळले होते. त्यांच्या संपर्कातील चौदा जणांची तपासणी केली असता एक नातेवाईक व एक नोकर, असे दोघे बाधित आढळले होते.
त्यानंतर आणखी तिघांच्या संपर्कातील लोकांची तपासणी सुरू केल्यापासून दोन दिवसांत चौदा व नऊ असे तब्बल 23 जण बाधीत आढळले आहेत. अजून वीसहुन अधिक जणांचे स्वॅब रिपोर्ट येणे बाकी आहे. शुक्रवारी (दि. 10) सकाळपर्यंत रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोणी काळभोर व कदमवाकवस्तीही गॅसवर
लोणी काळभोर- उरुळी कांचन शहराप्रमाणेच लोणी काळभोर व कदमवाकवस्ती हद्दीतही तीन दिवसांपासून रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. लोणी काळभोर हद्दीत सध्या 19 तर कदमवाकवस्ती हद्दीत 17 जण पॉझिटिव्ह आहेत. दोन्ही हद्दीत तब्बल 36 ऍक्टिव्ह रुग्ण असतानाही नागरिक मास्कविना फिरत असल्याचे दिसून येत आहे.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दोन्ही ग्रामपंचायत हद्दीत कंटेन्मेंट झोन जाहीर करूनही दुकाने सुरू ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. पोलीस प्रशासनानेच कायद्याचा दंडुका उगारण्याची गरज आहे.