पाटणा : बिहारच्या पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात झालेल्या चकमकीत बंदी घातलेल्या माओवादी भारतीय कम्यनिस्ट पक्षाच्या चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. ही कारवाई सशस्त्र सीमा बल, राज्याचे विशेष पथक आणि बिहार पोलिसांनी केली. या चकमकीत दोन पोलीस जखमी झाले.
वाल्मिकी व्याघ्र अभयारण्यात माओवादी बंडखोर जमा झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने चंपारण्य डोणे भागात छापा टाकला. त्यावेळी ही चकमक उडाली.
नक्षलवादी बेसावध होते. मात्र पोलीस आल्याचे समजताच त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यात चार नक्षलवादी ठार झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून तीन स्वयंचलीत बंदुका, एक एके 56 रायफल जप्त केली आहे, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक लालन मोहन यांनी दिली आहे. ते म्हणाले, मेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.