संगमनेर,(प्रतिनिधी)- तालुक्यातील निमज गावात बिरोबा महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपारिक वाद्याच्या स्वरामध्ये, फटाक्याची आतिषबाजी करत संपूर्ण गावातून काठीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रमांनी भाविकांची तर खेळण्याच्या दुकानांनी लहान मुलांची मने जिंकली. दिवसभर बिरोबाच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती.
निमज गावामध्ये बिरोबा (वीरभद्र) महाराजांचे मंदिर असून, त्यातील मूर्ती स्वयंभू आहे. सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी बिरोबा महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी प्रत्येकाच्या घरासमोर गुढी उभारून फुल, हार यांची सजावट करून नवीन वर्षांचे स्वागत केले जाते.
याच दिवशी निमज गावामध्ये बिरोबा महाराजांची यात्रा मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरी केली जाते. गावातील बरेचशे युवक बाहेरगावी कामानिमित्त राहतात परंतु आजच्या दिवशी सर्वजण घरी एकत्र येऊन बिरोबा महाराजांचे दर्शन घेऊन संपूर्ण नवीन वर्ष सुखासमाधानाचे आणि निरोगी जावे यासाठी मनोकामना करतात .
सकाळी आठ वाजता बिरोबा महाराजांची काठी प्रवरा नदीवर नेऊन त्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने आंघोळ घालून मंदिरात आणली. त्या काठीला वस्त्र परिधान करून आरती करून, पूजा केली गेली. त्यानंतर घंटा व डफ या वाद्याच्या गजरात काठी नाचवली. बिरोबाचा अभिषेक करून मूर्तीला सजविले. दिवसभर मंदिरात भक्तांची दर्शनासाठी रिघ लागली होती.
तर संध्याकाळी मंदिरातील काठ्यांची मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली.र ठिकठिकाणी महिला काठीची मनोभावे पूजा करून नाचतगाजत वाद्याच्या गजरात संपूर्ण गावातून काठी मिळवून पुन्हा मंदिरात आली. रात्रभर मंदिरामध्ये गाण्याचा कार्यक्रम झाला.
संध्याकाळी गावांमध्ये संपूर्ण गावातील वेगवेगळ्या समाजाचे लोक एकत्र येत मोठ्या आनंदाने आणि भक्तीने महाराज यांची यात्रा उत्सव साजरा करतात तर खेळण्याचे दुकाने लहान मुलांसाठी आकर्षण ठरले. संगमनेर येथील आधार रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या यात्रोउत्सवाची सांगता कुस्त्यांच्या जंगी हगाम्याने झाली.