मुंबई – राज्यातील नव्या सरकारने आपले बहुमत सिद्ध केल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या पदासाठी विविध नेत्यांची नावे चर्चेत होती. पण या चर्चेला फार वाव न देता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने अजित पवार यांची या पदावर नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून आता सरकारच्या संबंधात अधिक चमकदार कामगिरी अपेक्षित आहे.
अशातच विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी आभार प्रदर्शनाच्या भाषणादरम्यान ही भूमिका पार पाडणाऱ्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा उल्लेख केला. यामध्ये त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचाही उल्लेख केला. यावरून नारायणे राणे यांचे पुत्र आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत. तसेच “बदल्यात तुमच्या पाया पण पडू” असं देखील म्हटलं आहे.
राणे यांनी ट्विट केले आहे की,’आम्हाला दुसरं काही नको आमच्या माणसाला मानसन्मान दिलात, बदल्यात तुमच्या पाया पण पडू’ असं म्हणत या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
आम्हाला दुसरं काही नको आमच्या माणसाला मानसन्मान दिलात, बदल्यात तुमच्या पाया पण पडू 🙏🏻 pic.twitter.com/S4igWsDbd6
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 4, 2022
दरम्यान, या आधी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्याकडूनच शिवसेनेची कोंडी केली जात होती व त्यांना पुरेसा आर्थिक निधी दिला जात नव्हता अशी तक्रार करण्यात येत होती. त्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून इन्कार करण्यात आला असला तरी हा एक मोठा ठपका त्यांच्यावर ठेवला जात होता. बदलत्या राजकीय स्थितीत नवीन नेतृत्वाला वाव देण्यासाठी राष्ट्रवादी कडून या पदासाठी अनपेक्षित नाव पुढे केले जाईल अशी अपेक्षा होती. पण त्या पक्षाने आपल्या पारंपरिक नेतृत्वावरच ही जबाबदारी सोपवली आहे.