मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये सुरु असणारा राणे विरुद्ध शिवसेना हा वाद काही नवा नाही. त्यातच मागच्या आठवड्यात आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर जे काही घडले ते संपूर्ण राज्याने पहिले आहे. दरम्यान, नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मुंबईतील जुहूमध्ये राणेंच्या घरासमोर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यानंतर उद्धव ठाकरेंनी त्याच दिवशी सायंकाळी युवासेनेच्या नेत्यांची वर्षा या सरकारी बंगल्यावर भेट घेतली. आता याच मुद्द्यावरुन बुधवारी नारायण राणेंनी टोला लगावलेला असताना निलेश राणेंनेही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
जे छगन पोलिसांच्या आणि गर्दीच्या मागे उभे राहून तमाशा बघत होते त्यांना पक्षप्रमुख भेटले पण ज्यांना महाप्रसाद भेटला त्यांची साधी विचारपूस करायला पण पक्षप्रमुखाला वेळ नाही. pic.twitter.com/UPvaHKoQms
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 26, 2021
‘शिवसैनिकांना पडलेला प्रश्न’ असा या फोटोचा मथळा असून खाली दोन फोटो देण्यात आले आहेत. यापैकी पहिला फोटो हा उद्धव ठाकरेंनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळेचा आहे. या फोटोवर, “युवा सेना कार्यकारिणीमधील आंदोलनावेळी लपलेल्या बड्या बापांच्या आणि आमदारांच्या पोरांना भेटायला उद्धव ठाकरेंना वेळ आहे,” असे लिहिण्यात आले आहे. तर खाली कथित स्वरुपामधील जखमी कार्यकर्त्यांचे फोटो आहेत. या फोटोवर, “पण राणेंच्या बंगल्याखाली मारहाण झाल्याने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या जखमी १६ शिवसैनिकांना भेटायला वेळ नाही,” असा मजकूर आहे.
हा फोटो शेअर करताना निलेश राणेंनी, “जे छगन पोलिसांच्या आणि गर्दीच्या मागे उभे राहून तमाशा बघत होते त्यांना पक्षप्रमुख भेटले पण ज्यांना महाप्रसाद भेटला त्यांची साधी विचारपूस करायला पण पक्षप्रमुखाला वेळ नाही,” अशा कॅप्शनसहीत शेअर केला आहे.
दरम्यान, राणे आणि शिवसेना दोन्हीकडून सलग तिसऱ्या दिवशीही आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.