मुंबई – मार्गारेट अल्वा यांचे नाव उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून निश्चित करण्यात आले. त्यासाठी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीबाबतचे काही फोटो देखील शरद पवार यांनी ट्विट केले. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत उपस्थित असल्याचे देखील पाहायला मिळाले. याच मुद्द्यावरुन राणे बंधुंनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
आज बिगरभाजपा पक्षांबरोबरच इतर गटांशी आमची चर्चा झाली. देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आम्ही मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतला, अशा कॅप्शनसहीत पवारांनी फोटो ट्वीट केले. यातील एका फोटोमध्ये संजय राऊत देखील बैठकीत उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.
आज नॉन-बीजेपी राजनैतिक दलों के कई साथीयों से हमारी बातचीत हुई। देश के उपराष्ट्रपती चुनाव के लिये हमने श्रीमती मार्गारेट अल्वाजी को उम्मीदवार घोषित करने का निर्णय लिया है। pic.twitter.com/RxB8Fch4iP
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 17, 2022
यानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी हाच फोटो घेऊन वादग्रस्त मजकूर ट्विट केला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “त्यांचे नेते उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवाराला यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे. मग संजय राऊत विरोधकांच्या बैठकीला काय करत आहेत ? आपल्या मालकाचा इमानदार पाळीव प्राणी ! अजूनही वेळ गेलेली नाही उद्धवजी”, अशा आशयाचे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
“मॅच हरल्यानंतर प्लेअर ड्रेसिंग रुम” अस कॅप्शन देत नितेश राणेंचे बंधू निलेश राणे यांनी पवारांच्या बैठकीचा फोटो शेअर केलाय.