मुंबई – घरे तयार करण्यासाठीच्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळ या वर्षात घरांच्या किमती 20 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात असे क्रेडाई या विकासकांच्या संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
क्रेडाईने 30 डिसेंबर ते 11जानेवारी या कालावधीत देशभरातील 1,322 विकासकांना यासंदर्भात माहिती विचारून सर्वेक्षण केले. त्या माहिती या आधारावर तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार 60 टक्के विकासकांनी सांगितले की 2022 मध्ये घरांच्या किमती 20 टक्क्यांनी वाढतील. 40टक्के विकासकांनी ही वाढ 10 ते 20 टक्क्यांपर्यंत असेल असे सांगितले.
क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पटोडिया म्हणाले की, आता ओमायक्रॉनमुळे बऱ्याच शहरांमध्ये काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याचा अर्थव्यवस्थेवर आणि घरबांधणी क्षेत्रावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो.
हा परिणाम कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार काय उपाययोजना करते याकडे आमचे लक्ष आहे. गेल्या दोन वर्षापासून या क्षेत्रातील कामकाजावर परिणाम झाला असल्यामुळे बऱ्याच विकसकांनी विक्रीसाठी डिजिटल माध्यमाचा वापर वाढविला आहे. 39 टक्के विकसकांनी डिजिटल मार्केटिंग सुरू केले असून त्यांच्या 25 टक्के घरांची विक्री डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून झाली असल्याचे आम्हाला आढळून आले आहे.
क्रेडाईने म्हटले आहे की, कच्च्या मालाचे दर वाढत आहेत हा आमच्या चिंतेचा विषय आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट या विषयावरही आम्ही आमची बाजू सरकारकडे सांगितली आहे. या क्षेत्राला पुरेसे भांडवल उपलब्ध होत नाही. आवश्यक त्या परवानग्या वेळेवर मिळत नाहीत. यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र विकासकांचा आत्मविश्वास वाढला असून 92 टक्के विकसकांनी 2022 मध्ये घरांच्या नव्या योजना सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारने या क्षेत्रातील नियमांची गुंतागुंत कमी करून परवानग्या लवकर देण्याची गरज 92 टक्के विकसकांनी व्यक्त केली आहे.
2019 मध्ये राष्ट्रीय पातळीवर सुरू करण्यात आलेल्या क्रेडाई या संघटनेमध्ये देशभरातील 13,000 विकसक आहेत. 21 राज्यातील 221 शहरात या संघटनेच्या शाखा आहेत.