उस्मानाबाद (प्रतिनिधी) – महंत तुकोजी बुवा यांचा वाढदिवस साजरा करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत मास्क न घालणे यासह इतर कारणामुळे तुळजाभवानी देवीचे पुजारी महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा यांच्यासह ७ जणांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महंत तुकोजी बुवा यांचा १० एप्रिल रोजी वाढदिवस साजरा करताना केक कापण्यात आला होता. यावेळी महंत वाकोजीबुवा, ऍड संजय पवार, तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी व इतर ३ जणांनी तोंडाला कोणत्याही प्रकारचे मास्क वापरले नाहीत शिवाय सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन न करता बेकायदेशीरपणे जमाव जमविला.
वाढदिवसाचा ११ सेकंदचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पसरविण्यात आला तसेच तो सुरज जगताप या नावाच्या फेसबुक अकाउंटवरून अपलोड करण्यात आला. पोलिसांनी या व्हिडीओ आधारे या सर्व व्यक्ती विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेचे कलम १८८,२६९ व महाराष्ट्र कोविड उपाय योजना नियम २०२० कलम ११ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.