म्हातारपणी येतायेत ‘मरण यातना’; SBIच्या कारभाराला ज्येष्ठ नागरिक ‘वैतागले’

इस्लामपूर  – पैशांची हमी अन् धोका नाही म्हणून आम्ही भारतीय स्टेट बँकेत व्यवहार करतो. पण येथे आम्हाला म्हातारपणी मरण यातना भोगाव्या लागतायेत अशी तीव्र नाराजीची भावना जेष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत. कोणाची पेन्शन इथं मिळते..कोणाचे ठेवींवरील व्याज काढायचे असते. म्हणून वयोवृद्ध नागरिक भारतीय स्टेट बँकेत येतात. पण इथला कारभार पाहून ते वैतागतात. इथल्या अनुभवाचा पाढा शनिवारी या वयोवृद्धांनी वाचला..

इस्लामपूर येथे सावकार कॉलनीत भारतीय स्टेट बँकेची (एसबीआय) शाखा आहे. येथे जेष्ठ नागरिक खातेदार दुर्लक्षित आहेत. शहरात एकच शाखा असल्याने एसबीआयमध्ये खातेदारांची संख्या माेठी आहे. या शाखेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना रांगेत तासन्‌ता‌स ताटकळत उभे राहावे लागते. शिवाय, बँक कर्मचारी सन्मानजनक वागणूक देत नाहीत असे रोजचे चित्र आहे.

एसबीआयच्या शाखेत स्थानिक व परिसरातील गावांमधील व्यापारी, शासकीय व खासगी कर्मचारी, शेतकरी, कामगार, पेन्शनधारक, शासकीय याेजनांचे लाभार्थी कर्जदार यांच्यासह इतर नागरिकांची खाती असल्याने या शाखेच्या खातेदारांची संख्या माेठी आहे. त्यामुळे बँकेत राेज खातेदारांची गर्दी असते.

प्रशस्त इमारतीत बँके असल्याने काऊंटरसमाेर जागा आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कॅश काऊंटर इमारतीच्या बाहेर खिडकीत आहे. ते ही एकच असल्याने तिथे गर्दी असते. संबंधित काऊंटरसाठी जलद गतीने काम करणारी व्यक्ती असायला हवी. पण कर्मचाऱ्यांच्या निवांत कामामुळे तासंतास खातेदारांना रांगेत उभे राहावे लागते. यात महिलांची व जेष्ठ नागरिकांची कुचंबणा हाेत आहे.

ज्येष्ठ नागरिकांना रांगेत बराच वेळ उभे राहणे शक्य हाेत नसल्याने ते नंबर जाऊ नये म्हणून मध्येच बसतात. त्यामुळे त्यांना नंबरला असणाऱ्या इतर खातेदारांच्या राेषाला सामाेरे जावे लागते. कर्मचारी लहानसहान चुकांसाठी उद्धट उत्तर देत असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिकांनी दिली. अडाणी व्यक्तीला समजत नाही तेव्हा उडवा उडवाची उत्तरे दिली जातात.

यामुळे जेष्ठ नागरिक भांबावून जातात. अनेक वयोवृद्ध लोक रिक्षातून येतात. त्यावेळी आजारी नागरिक असल्याने ते रिक्षात ताटकळत बसून असतात. अनेकदा रिक्षा चालक रांगेत उभे राहून त्यांना मदत करतात. यामुळे जेष्ठ नागरिकांना वेगळे कॅश काऊंटर द्या अशी मागणी अनेक वर्षे दुर्लक्षित आहे. जेष्ठ नागरिकांकडे बँक व्यवस्थापन लक्ष देत नसल्याचा आराेपही त्यांनी केला.

बाहेरगावाहून आलेल्या वयाेवृद्ध व्यक्तीला या शाखेत हजारभर रुपये काढण्यासाठी दाेन तास रांगेत उभे राहावे लागते. अनेकदा लिंक,सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगतात. दुसरीकडे, हेच कर्मचारी कामाच्या वेळी आपसात अथवा फाेनवर गप्पा करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकाराबाबत बँक अधिकाऱ्यांची ‘तेरी भी चूप.. मेरी भी चूप” अशी भूमिका असते.

इस्लामपूर येथील शाखेत खातेदारांची संख्या अधिक आहे. यामुळेच शहरात अजून एखादी भारतीय स्टेट बँकेची शाखा हवी अशी मागणी होत आहे. सध्या कोरोनाच्या मुळे सर्वत्र दक्षता घेतली जाते. पण बँकेच्या प्रवेशदारातच वॉचमन अंगावर धावून आल्यासारखे वर्तन करतात. जेष्ठचं काय सर्वांनाच एसबीआयचा अनुभव ” भीक नको पण कुत्रा आवर” असा आहे. याकडे बँक प्रशासन लक्ष देणार का ? प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही तर लोकप्रतिनिधींना याकडे लक्ष घालावे अशी मागणी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.