सिंगापुर – पुण्यातील प्रख्यात सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना यंदाचा एशियन ऑफ द ईयर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंगापुरच्या द स्ट्रेट टाईम्स तर्फे या पुरस्कारासाठी सहा जणांची यादी जाहीर झाली आहे त्यात हे नाव आहे.
सीरम इन्स्टिट्युटने ऑक्सफर्ड युनिर्व्हीसीटी आणि ऍस्ट्राझेनका कंपनीच्या संयुक्त विद्यमाने करोनावरील कोविशिल्ड नावाची लस विकसित केली असून त्याच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. अन्य पुरस्कार विजेत्यांमध्येही करोनाच्या औषधांच्या संबंधात योगदान देणाऱ्या व्यक्तींचाच भरणा आहे.
या क्षेत्रातील सहाही पुरस्कार विजेत्यांचा उल्लेख द व्हायरस बस्टर्स असा करण्यात आला आहे. करोनाच्या साथीमुळे आज सारे जग अडचणीत आहेत. लक्षावधी लोकांना याची लागण झाली असून त्यातील मृतांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे या रोगावर इलाज शोधणे ही मानवतेची सर्वात मोठी गरज आहे. आणि त्यासाठी कष्ट घेणाऱ्यांचा हा सन्मान आहे.
या पुरस्कार विजेत्यांनी केवळ अशियासाठी नव्हे तर संपुर्ण जगासाठी अत्यंत मोलाची कामगीरी केली आहे असे पुरस्कार देणाऱ्या समितीने म्हटले आहे.अदर पुनावाला यांनी सन 2001 मध्ये या कंपनीचे कार्य सुरू केले आणि सन 2011 मध्ये ते कंपनीचे सर्वेसर्वा झाले आहेत. त्यांनी जगातील गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांना ही लस प्राधान्यांने देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.