गंगटोक – सिक्कीममध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एसकेएमसोबत भाजपने निवडणूकपूर्व युती करावी असा जोरदार आग्रह भाजपचे गंगटोकचे आमदार वाय टी लेपचा यांनी धरला आहे. ते म्हणाले की भाजपने या राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचे धाडस केले तर ते अंगलट येऊ शकते, भाजपला पाचशे मतेही मिळू शकणार नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा या पक्षाच्या कामाबाबत असमाधान व्यक्त करीत राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या निवडणूका स्वबळावर लढवण्याचा इरादा व्यक्त केला आहे. त्याला लेपचा यांचा विरोध आहे. ते म्हणाले की, 2024 मध्ये होणाऱ्या सिक्कीममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपची कोणतीही जागा जिंकण्याची शक्यता नाहीं भाजपला सिक्कीम क्रांतीकारी पक्षाशी युती करूनच निवडणूक लढवणे लाभदायी ठरू शकते.
ते म्हणाले की, भाजपने स्वबळावर पंचायतीची एकही जागा जिंकलेली नाही. आम्ही एसकेएमसोबत युती करून दोन विधानसभा पोटनिवडणुका जिंकल्या आहेत, त्यामुळे एसकेएम आणि भाजप यांच्यातील युती 2024 मध्येही कायम राहावी याला मी वैयक्तिकरित्या अनुकूल आहे.
भाजपचे प्रवक्ते कमल अधिकारी यांनी मात्र लेपचा यांनी व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगितले.ते म्हणाले, “आम्ही सिक्कीममधील विधानसभेच्या सर्व 32 जागा स्वबळावर लढवू कारण आतापर्यंत कोणत्याही युतीबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झालेली नाही.सिक्कीम मधे भाजपने सत्ताधारी एसकेएम पक्षाला बाहेरून पाठिंबा दिला आहे.
या विधानसभेत भाजपकडे 12 आमदार आहेत, त्यापैकी दहा 2019 मध्ये सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट मधून आलेले आहेत, तर केवळ इतर दोघेच भाजप पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत