क्रीडाक्षेत्र पुन्हा एकदा निश्‍चितच बहरेल – गांगुली

नवी दिल्ली – करोनाचा धोका वाढत असल्याने प्रतिष्ठेची ऑलिम्पिक स्पर्धाच नव्हे तर जागतिक क्रीडाक्षेत्रातील अनेक स्पर्धा एकतर रद्द झाल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगसह काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या क्रीडाक्षेत्राला निराशेच्या वातावरणाचा सामना करावा लागत आहे. मात्र, पुन्हा एकदा हे क्षेत्र बहरेल व मैदानांवर खेळाडूंची प्रभावी कामगिरी पाहण्यासाठी गर्दी दिसू लागेल, अशा शब्दांत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ट्विटरवर आपला आशावाद व्यक्‍त केला आहे.

करोना विषाणूंच्या प्रसारामुळे सध्या देशासह जगभरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई, कोलकाता, बंगळुरू यांच्यासह जगभरातील मोठ्या शहरांमध्ये अवकळा पसरलेली आहे. केंद्र व विविध राज्यांतील सरकारने जीवनावश्‍यक सेवा सोडल्या तर बाकी सर्व लॉकडाऊन केले आहे. तसेच संचार किंवा जमावबंदी देखील लागू केली आहे. त्यामुळे सध्या खेळ सोडा साधे रस्त्यांवर येणे देखील अशक्‍य बनले आहे. या स्थितीत क्रीडा स्पर्धांचे आयोजन देखील होऊ शकत नाही. जपानमध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धाही पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्थिती पाहिली की अत्यंत निराशा येते. मात्र, ही वेळही निघून जाईल व क्रीडा क्षेत्रावरीलच नाही तर एकूणच सगळ्यांच्या दैनंदिन जीवनावर झालेला परिणाम दूर होईल व करोनाचे मळभही दूर होईल, असा विश्‍वासही गांगुलीने व्यक्त केला आहे.

येत्या 29 मार्चपासून सुरू होणार असलेली आयपीएल स्पर्धाही 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता करोनाचा धोका संपण्याचे नाव घेत नाही हे स्पष्ट झाल्याने बीसीसीआय ही स्पर्धा रद्द करण्याचीच शक्‍यता जास्त आहे. ही स्पर्धा येत्या सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये घेता येईल का याबाबतही विचारमंथन सुरू आहे. यावर देखील गांगुलीने अजून दोन आठवडे थांबा मगच अधिकृत निर्णय जाहीर करण्यात येईल असे सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.