हैदराबाद – देशात लॉकडाऊन असल्याने तसेच करोनाचा धोका असल्याने देशातीलच नाही तर जागतिक स्तरावरील विविध स्पर्धा लांबणीवर पडल्या आहेत. तर, काही स्पर्धा रद्दही झाल्या आहेत. स्पर्धा कधी एकदा सुरू होतील आणि कधी मला कोर्टवर उतरता येईल अशा शब्दात भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर आता मी पूर्ण तंदुुरुस्त असून सर्व स्तरावरील टेनिस खेळण्यासाठी सज्ज आहे, असेही सानियाने सांगितले आहे.
सानियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात सानिया टेनिस कोर्टच्या भिंतीजवळ बसलेली असून तिच्या आजुबाजूला टेनिसचे अनेक चेंडू ठेवलेले असून सानियाच्या हातात रॅकेटही दिसत आहे.
करोनाचा धोका वाढू लागल्याने जगभरात अनेक स्पर्धांना त्याचा फटका बसला आहे. त्यातच भारतातही विविध स्तरांवरच्या सर्व स्पर्धा एकतर रद्द करण्यात आल्या तर, काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यातच टेनिसच्या देखील अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत. केवळ स्पर्धाच नव्हे तर सर्व क्रीडा प्रकारांची सराव शिबिरेही बंद करण्यात आली आहेत.
करोनाचा खूप मोठा फटका क्रीडा जगतालाही बसलेला असल्याने सर्व खेळाडू सध्या आपापल्या घरातच आहेत. त्यामुळे त्यांची सोशल मीडियातील उपस्थिती लक्षणीय वाढली आहे. त्यात सानियाचाही समावेश आहे. सानिया देखील लॉकडाऊनमुळे घरीच आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तिला टेनिस कोर्टवर उतरताच आलेले नाही. त्यामुळे ती टेनिस कोर्टवर उतरण्यासाठी आतूर बनल्याचेही ट्विट तिने केले आहे.