अपयशाची मालिका सिंधू आज खंडित करणार?

बॅंकॉक – इंडोनेशिया व जपान या दोन्ही स्पर्धांमध्ये जपानच्या अकेनी यामागुचीकडून पराभूत होणारी पी.व्ही.सिंधू येथील थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अपयशाची मालिका खंडित करणार काय याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या स्पर्धेस आजपासून प्रारंभ होणार आहे.

ऑलिंपिक जागतिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला अगोदरच्या दोन्ही स्पर्धांमध्ये यामागुचीने सरळ दोन गेम्समध्ये हरविले होते. सिंधूला गेल्या सात महिन्यांमध्ये विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. येथील पहिल्या फेरीत तिला चीनच्या हान युईच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. सिंधूने जपान स्पर्धेतील पहिल्या फेरीतच हानला पराभूत केले होते. जर तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली तर तिच्यापुढे थायलंडच्या राचानोक इन्तानोनचे आव्हान असणार आहे.

महिलांमध्येच भारताची साईना नेहवाल उतरली आहे. जपान स्पर्धेतून तिने दुखापतीमुळे माघार घेतली होती. येथील पहिल्या फेरीत तिचा पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या खेळाडूबरोबर सामना होणार आहे. पुढील महिन्यात जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी सामन्यांचा सराव मिळावा म्हणूनच तिने येथे भाग घेतला आहे.

पुरूषांच्या एकेरीत भारताच्या शुभंकर डे याची अग्रमानांकित केन्तो मोमोता या जपानच्या खेळाडूशी गाठ पडणार आहे. मोमोताने जपान स्पर्धेत भारताच्या बी.साईप्रणीतचा उपांत्य फेरीत पराभव केला होता. साईप्रणीतचा येथे स्थानिक खेळाडू केन्ताफोन वॉंगचारोन याच्याशी सामना आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.