तीन ठार पंधरा जण जखमी
लॉस एंजल्स – कॅलिफोर्नियात गिलरॉय भागात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या फूडफेस्टीव्हलच्या ठिकाणी अदांधुद गोळीबार करण्याचा प्रकार घडला. त्यात तीन जण ठार झाले तर अन्य 15 जण जखमी झाले आहेत. एका 30 वर्षीय अज्ञात इसमाने या फेस्टीव्हलवरील गर्दीवर गोळीबार केला. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दुसऱ्या एका वृत्तात सुरक्षा जवानांनी त्याला जागेवरच ठार केल्याचे म्हटले आहे. त्याच्याबरोबर आणखीही एक त्याचा सहकारी होता. पण तो गोळीबारानंतर झालेल्या धावपळीचा फायदा घेऊन फरारी झाला आहे. दरवर्षीै तीन दिवसांचा हा फेस्टीव्हल होतो आणि तेथे किमान लाखभर लोक भेट देत असतात. आज समारोपाच्या दिवशीच तेथे ही घटना घडली.
कॅलिफोर्नियाचा हा फूडफेस्टीव्हल प्रसिद्ध आहे. त्यासाठी रविवारी तेथे खूप गर्दी झाली होती. मारेकरी जमावावर गोळीबार करण्याच्या उद्देशानेच तेथे आला होता असे त्याच्या अविर्भावातून पुर्णपणे दिसून येत होते असे काही प्रत्यक्षदर्शींनी नमूद केले. या गोळीबाराचा हेतू आणि मारेकऱ्याचा तपशील मात्र अजून जाहीर करण्यात आलेला नाही. अध्यक्ष ट्रम्प यांनी या घटनेवर दुख: व्यक्त केले असून त्यांनी नागरीकांना जागरूक राहण्याची आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.