पुणे – परदेश दौरे करायला पंतप्रधानांकडे वेळ आहे, पण जळणाऱ्या मणिपूरला भेट देण्यासाठी वेळ नाही. चार महिन्यांपासून देशातले हे राज्य हिंसाचार, अत्याचाराने जळते आहे, पण पंतप्रधानांना त्याविषयी संसदेत निवेदन करण्याइतकीही संवेदनशीलता नाही. अशा परिस्थितीत, एका संस्थेचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून तीव्र निषेधाचे आंदोलन करण्याचा निर्णय इंडिया फ्रंट, पुणेतर्फे घेण्यात आला आहे.
1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता इंडिया फ्रंट, पुणेचे सर्व सहकारी पक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक, जेष्ठ समाज नेते डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करून विरोध दर्शवणार आहेत, अशी माहिती प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
इंडिया फ्रंट, पुणेचे समविचारी असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (शरद पवार गट), माजी आमदार जयदेव गायकवाड, शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी आमदार रमेश बागवे, कम्यूनिस्ट पक्षाचे कॉम्रेड अजित अभ्यंकर, तसेच नितीन पवार, लता भिसे, मेधा थत्ते, दत्ता पाकिरे, अनिस अहमद, संदीप बर्वे, इब्राहीम खान, दीपक पाटील, सुरेखा गाडे उपस्थित होते.