नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोलच्या दरात 20 पैशांची, तर डिझेलच्या दरात 23 पैशांची वाढ केली. दोन्ही इंधनांच्या दरांमध्ये मागील पंधरवड्यात झालेली ती 12 वी वाढ ठरली.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांचा दर आणि इतर आर्थिक घटकांचा विचार करून सार्वजनिक कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतात. त्यानुसार, दरदिवशी दर बदलतात किंवा जैसे थे राहतात.
जवळपास दोन महिने सार्वजनिक कंपन्यांनी दोन्ही इंधनांच्या दरांमध्ये कुठलाही बदल केला नव्हता. त्या विश्रामानंतर 20 नोव्हेंबरपासून पुन्हा दरांचा दैनंदिन आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हापासून 15 दिवसांच्या कालावधीत पेट्रोल 1 रूपया 80 पैशांनी, तर डिझेल 2 रूपये 61 पैशांनी महागले. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत डिझेलचा दर 73 रूपयांवर गेला आहे. तर, पेट्रोल 83 रूपयांच्या घरात पोहचले आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर 89 रूपये 52 पैसे, तर डिझेलचा दर 79 रूपये 66 पैसे इतका झाला आहे. सार्वजनिक कंपन्यांनी केलेली दरवाढ संपूर्ण देशात लागू होते. मात्र, स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित कराच्या (व्हॅट) भिन्न दरांमुळे राज्याराज्यांत इंधन दर वेगवेगळे आहेत.