‘वरवरा राव’ यांची तात्पुरत्या जामिनाची मागणी न्यायालयाने फेटाळली 

माओवादी संघटना प्रकरण :भावाच्या पत्नीचे निधन झाल्याने धार्मिक विधीसाठी मागितला होता तात्पुरता जामीन 

पुणे – भावाच्या पत्नीच्या निधनानंतरच्या विधींसाठी तात्पुरता जामीन देण्याची माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटकेत असलेल्या कवी आणि लेखक वरवरा राव यांनी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली. विशेष न्यायाधीश वडणे यांनी हा आदेश दिला.

सध्या राव हे येरवडा कारागृहात आहेत. त्यांच्या भावजयीचे 22 एप्रिल रोजी निधन झाल्याची माहिती त्यांना कळली. राव यांच्या मोठ्या भावाचे यापूर्वीच निधन झाल्याने घरात तेच मोठे आहेत. निधनानंतर 9 ते 12 दिवसांपर्यंतच्या धार्मिक विधीसाठी घरातील मोठी व्यक्ती उपस्थित असणे गरजेचे असल्याने त्यांनी विधींसाठी न्यायालयाकडे 29 एप्रिल ते 4 मे दरम्यान तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. अन्यथा पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. या अर्जावर सरकारी पक्षाला तसेच पोलिसांना आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी त्यांचे म्हणणे सादर केले. त्यामध्ये त्यांनी राव हे बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेचे वरिष्ठ आणि सक्रिय नेते आहेत. ते सध्या अतिशय गंभीर आणि देशविरोधी गुन्ह्यात सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

गुन्ह्याचा तपास अद्यापही सुरू असून राव यांच्या वतीने करण्यात आलेली विनंती मान्य केल्यास गुन्ह्यातील उपलब्ध पुरावा ते नष्ट करण्याची शक्‍यता आहे. धार्मिक विधीसाठी नातेवाईक, मित्र परिवार तसेच तेथील स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. नुकत्याच झालेल्या नक्षली कारवाया पाहता राव यांच्या संरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांना तेथील सर्वच व्यक्ती अपरिचित आहेत. तेथील नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर हल्ला होऊन राव यांना पळून जाण्यास मदत होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नक्षवाद्यांचा हेतू साध्य होईल. तसेच राव हे भूमिगत झाल्यास पुन्हा सापडणार नाही, असे लेखी म्हणणे पोलिसांनी सादर केले होते. यावर सुनावणी करत न्यायालयाहे वरील आदेश दिला

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)