जालना – राज्यात करोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असून दिवसेंदिवस नवीन रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. मात्र, युरोपमधील काही देशांमध्ये दुसरी लाट आल्याने राज्य सरकार ही लाट रोखण्यासाठी पूर्ण तयारीत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राजेश टोपे म्हणाले, युरोपीयन देशात करोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे त्या देशांत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे देश आणि राज्यातही करोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जाती आहे. मात्र राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी असून आली तरी राज्य सरकारची पूर्ण तयारी असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.
त्याचबरोबर याआधी लग्नसमारंभात पन्नास लोकांना परवानगी दिली होती त्यांच्या संख्येत वाढ करण्याचा विचार सरकार करत असल्याचेही टोपे यांनी सांगितले. तसेच मंदिर उघडण्याबाबतचा निर्णय हा दिवाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करून घेतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
मुंबईत करोना चाचणी मोफत
करोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मुंबईत आता करोना चाचणी मोफत होणार आहे. मुंबई महापालिकेकडून आजपासून 244 ठिकाणी मोफत चाचणीची सोय करण्यात आली आहे.
त्यामुळे करोनाची लक्षणे असल्यास नागरिक महापालिकेच्या हेल्पलाईनवर किंवा 1916 या क्रमांकावर संपर्क साधून जवळच्या केंद्राची माहिती घेऊन तिथे मोफत चाचणी करु शकतात. तसेच काही ठिकाणी आरटीपीसीआर पद्धतीची वैद्यकीय चाचणी; तर उर्वरित ठिकाणी अँटीजेन आधारित वैद्यकीय चाचणी उपलब्ध असणार आहे.