पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा तांत्रिक कारणाने देऊ न शकलेल्यांची फेरपरीक्षा 5 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. याचे अभ्यासक्रमनिहाय वेळापत्रक सोमवारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्रसिद्ध केले. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहेत.
शिक्षणशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, मानसनिती व समाजविज्ञान, शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम या अभ्यासक्रमांची परीक्षा दि. 5 नोव्हेंबरला होतील. वाणिज्य, व्यवस्थापन व विधी अभ्यासक्रमांची परीक्षा 6 नोव्हेंबरला, तर कला व विज्ञान अभ्यासक्रमांची परीक्षा 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.
अंतिम वर्षातील नियमित, रिपीटर्स विद्यार्थी, बहि:स्थ अभ्यासक्रमातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा दि. 12 ऑक्टोबरपासून घेण्यात आली. तांत्रिक व अन्य कारणांसाठी परीक्षेदरम्यान अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांकडून गुगल फार्म भरून घेण्यात आला आहे.
या परीक्षेस विविध कारणांमुळे काही विद्यार्थी अनुपस्थित राहिले आहेत. त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे, असेही काकडे यांनी स्पष्ट केले.