पुणे- महापालिकेतील नगरसचिव कार्यालयातील रिक्त 25 पदे भरली जाणार आहेत. पण, या पदांवर नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. त्यामुळे या विभागात वशिलेबाजी जारोत असल्याची चर्चा आहे.
नगरसचिव कार्यालयात एकूण 98 जागा आहेत. त्यातील 54 जागा भरल्या आहेत. उरलेल्या 44 पैकी 25 जागा भरण्यात येणार आहेत. त्यातूनही उरलेल्या जागा टप्प्याटप्प्याने भरल्या जाणार आहेत. या जागा शिपाई आणि क्लार्क पदाच्या आहेत. ही पदे करार पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
सध्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये हंगामी स्वरुपात विविध कामे करणारे कार्यकर्ते आहेत. त्यात पत्र टाइप करून देण्यापासून, ते अन्य कामे करणारे कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांचे या नगरसचिव कार्यालयातील पदांवर पुनर्वसन केले जाणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
दरम्यान, गेल्या 13 महिन्यांपासून नगरसचिव आणि उपनगरसचिव पदही रिकामे आहेत. ती भरण्याविषयीची मागणी केली जात नाही. सध्या हे काम प्रभारी म्हणून शिवाजी दौंडकर यांच्याकडे देण्यात आले आहे. याशिवाय उपनगरसचिव पदही प्रभारींवरच सुरू आहे. वास्तविक या विभागाचे काम संपूर्ण महापालिकेच्या कामकाजात महत्त्वाचे
आहे.
महापौर कार्यालय, सगळ्या समित्या त्यातील मुख्यत्त्वे स्थायी समिती यांचे कामकाज या कार्यालयाकडून चालवले जाते. त्यामुळे हे खाते महत्त्वाचे आहे. असे असताना याचे कामकाज अजूनही प्रभारींवरच चालवले जात आहे.
या पदासाठी महापालिकेने मध्यंतरी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये 54 अर्ज आले होते, मात्र त्यामध्ये कोणीच पात्र उमेदवार नसल्याने मुलाखतींसाठीही कोणाला बोलावण्यात आले नाही.