नांदेड – शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडच्या रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटलांनी थेट रुग्णालयाच्या डीनलाच स्वच्छतागृह साफ करायला लावले. हे प्रकरण हेमंत पाटलांना भोवले असून त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी तक्रार दाखल केली.
हेमंत पाटील यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. पाटील म्हणाले, रुग्णालयात 260 कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत. 36 रुग्ण दगावल्यानंतरही अधिकारी स्वतः चेंबरमधून बाहेर येत नाही आणि यामुळे प्रचंड अनास्था या रुग्णालयात पाहायला मिळत आहे. रुग्णालयातील अनास्थेच्या चिडीपोटी मी हे कृत्य केले आहे आणि त्यांनीच नाहीतर मी स्वतः देखील सफाई केलेली आहे. मी अधिष्ठातांना म्हटले की, 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला पंतप्रधान मोदींनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. आपण शौचालय साफ करू. मी स्वत:हा पाणी टाकून शौचालय साफ केलं.
यात अधिष्ठातांना कुठेही आरेतुरे किंवा जातीवाचक शिवीगाळ केली नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारल्याने अॅट्रोसिटी गुन्हा दाखल होत असेल, तर गंभीर बाब आहे. मृत्यूंवर कोणतीही चर्चा होत नाही. कुठलीही संघटना आंदोलन करत नाही, अशी खंत हेमंत पाटील यांनी व्यक्त केली.
रात्री ३ वाजता गुन्हा दाखल होत, असेल तर या प्रकरणात शंभर टक्के राजकारण आहे. मी शिवीगाळ केली किंवा जातीवाचक बोललो तर नक्की गुन्हा दाखल करा. पण, जातीवाचक बोललो नसताना अॅट्रोसिटी दाखल होणे चुकीचे आहे, असेही हेमंत पाटील यांनी म्हटले आहे.