इस्लामपूर : तो.. मूळचा उत्तर प्रदेशचा. महाराष्ट्रात राहिला.. रोख रक्कम चोरी करून तो हजारो मैलावर पंजाबला फरारी झाला.. त्याने मोबाईल स्विच ऑफ केला. तब्बल नऊ महिन्यानंतर मोबाईल सुरू केला.. अन् इस्लामपूर पोलिसांच्या तावडीत सापडला. कलामुद्दीन यासीन खान ( वय २८) या चोरट्याला पंजाबमधील बलोंगी- मोहली येथे ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला सात मार्च पर्यत पोलीस कोठडी दिली आहे.
त्याचे असे झाले ;
कलामुद्दीन वाघवाडी येथे क्रेन ऑपरेटर म्हणून कामाला होता. पाच वर्षे प्रामाणिकपणे मालकाचा विश्वास संपादन केला. एके दिवशी मालक नसताना ऑफिस केबिनमध्ये अडकवून ठेवलेल्या पॅन्टच्या खिशातून ३० हजार रुपयांची रोकड लांबून तो पळाला. पाच वर्षे विश्वासाने काम केलेला कामगार अशी चोरी करेल असे मालकालाही वाटले नव्हते. पण तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. चोरी करून त्याने पलायन केले. त्याचा नेहमीचा मोबाइल बंद झाला. या प्रकरणी स्क्रॅप दुकानचे मालक अब्दुला बैतुल्ला खान रा. वाघवाडी यांनी पोलीस ठाण्यात जून २०१९ मध्ये फिर्याद दिली होती.
क्रेनवर ऑपरेटर म्हणुन कलामुद्दीन यासीन खान (वय २८ वर्षे ,रा. बनबिरा कुशीनगर उत्तरप्रदेश ) हा पाच वर्षापासुन स्क्रॅप दुकानात कामास होता. तो ऑपरेटर असल्याने ऑफिसमध्ये त्याची ये जा असायची. नेहमी त्याचे तिथे वावरणे असायचे. तसेच तो दुकानशेजारीच भाड्याने खोलीत त्याचे कुटुंबातील ५ लोकांसह राहण्यास होता. १३ जून २०१९ ला दुकान मालकांने ऑफिसमध्ये क्रेनचे व स्क्रॅपचे आलेले व इतर लोकांकडून जमा केलेले ३० हजार रुपये केबीनमध्ये हॅन्गरला अडकवून ठेवलेल्या पॅन्टचे खिशात बघितले असता ते नसल्याने लक्षात आले.
घरातील लोकांनी पैसे घेतले असतील असे समजून दुकान मालकांनी घरातील लोकांना विचारले. परंतु कोणीही पैसे घेतले नसल्याचे लक्षात आले. तेव्हा ऑफिसमधील कॅमेरे चेक केले असता त्यात कामास असलेला कलामुद्दीन यासीन खान कॅमेरमध्ये पॅन्टच्या
खिशातील पैसे घेत असताना दिसला. लगेच त्यांनी कलामुद्दीन याच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी त्याच्या घराला कुलुप होते. आणि त्याचा मोबाईल फोन बंद लागला. अन् तो फरारी झाला. अखेर तो मोबाईल नऊ महिन्यांनी सुरू केल्यानंतर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, इस्लामपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोरट्याला अटकेची मोहीम फत्ते केली.
पोलीस नाईक प्रदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील दोघांनी चोरट्यांच्या मोबाईल लोकेशनवरून तपासासाठी पंजाब गाठले. बलोंगी-मोहली येथे पंजाब पोलिसांच्या सहकार्याने कलामउद्दीन याला अपघातातील वाहने बाजूला हटवण्यासाठी क्रेन पाहिजे असे सांगत पोलीस ठाण्यात आणले आणि त्याला ताब्यात घेतले.